राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून विधानसभा निवडणुकीपासून ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक मोठे नेते आणि पदाधिकरी यांनी ठाकरे गटाला निरोप देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे 10 पैकी 10 आमदार विजयी झाले. त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉ. मिणचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने ते शिवसेनेचे धनुष्य हाती घेणार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने सेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शरद सोनवणे प्रयत्न करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला त्यांचा फायदा होईल, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांना आहे.