तळेगाव येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव मधील का क्रिकेट अकादमीच्या प्रशासकीय इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसोबत पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे बचावकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात एक पेट्रोल पंपही आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. पेट्रोल पंप सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून मोठा अनर्थ टळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात तपास सुरू आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अकादमीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.