मनमाड : नैवेद्या बिदरी, रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम हाती घेत असते.तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन अग्रेसर असते हे आपण नेहमीच पाहत आलो आहे. त्यातच धावत्या प्रवासी रेल्वे गाडीत प्रवाशांना आर्थिक टंचाई भासुने यासाठी चक्क रेल्वे गाडीतच ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात एटीएम सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड पंचवटी एक्सप्रेस प्रवासी रेल्वे गाडीत देशातील पहिल्या ऑनबोर्ड एटीएमसाठी भुसावळ विभागाकडून चाचण्या सुरु केली असून याचा फायदा नक्कीच प्रवाशांना होणार आहे. तसेच रेल्वेच्या महसुलात देखील वाढ होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल (Non-Fare Revenue) संधींचा शोध घेण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम सुरू करत नव्या युगाची सुरुवात केली आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने, भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेच्या समन्वयाने धावत्या गाडीत देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा सुरू करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत.गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या दूरदृष्टीपूर्ण कल्पनेला प्रतिसाद देत, प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने "नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना" (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला.
सध्या गाडी क्रमांक १२११० मनमाड–मुंबई सीएसएमटी - मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण २२ डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता २०३२ असून दररोज सुमारे २२०० प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे. या सेवेसाठी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेवर किंवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण एटीएम कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत बसवण्यात येत आहे. ही संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवली जात आहे.ही ऑनबोर्ड एटीएम सेवा प्रत्यक्षात अंमलात आल्यावर, प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होतील.
भारतीय रेल्वेच्या प्रवासी अनुभवात सातत्याने सुधारणा आणि पारंपरिक महसूल पद्धतींपलीकडे जाऊन नवकल्पना राबवण्याच्या वचनबद्धतेचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भुसावळ विभागाला या उपक्रमाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान असून लवकरच इतर महत्वाच्या गाड्यांमध्येही ही सुविधा देण्याच्या शक्यतेचा विचार केला जात आहे, जेणेकरून रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि प्रवाशीहितकारी होईल.