गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान एक निर्घृण हत्येची घटना अकोले येथून उघडकीस आली आहे.
अकोल्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड रोडवरील बंद असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीमध्ये व्यापारी रमण चांडक यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमण चांडक हे मूळचे अकोट तालुक्यातील पणज गावचे रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून रमण चांडक अकोल्यातील गीता नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार चांडक यांचा ऑटो डिलिंगचा व्यवसाय होता. अलीकडच्या काळात त्यांचा काही लोकांसोबत आर्थिक वाद सुरू होता. या वादातूनच त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि आवश्यक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गजानन नावाच्या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. रमण चांडक यांच्या हत्येमागे काय कारण आहे? हे तपास झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.