नाशिक दौऱ्यावर असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होत मात्र, त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.दरम्यान, आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवरून वादग्रस्त विधान केले असल्याची माहिती आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे. ‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’ असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले कोकाटे?
“ एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना सुनावलं आहे. कांद्याचा बाजरभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं आहे. दरम्यान, कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागांमध्ये फळ बागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषीमंत्र्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी सुरू आहे.
कर्जमाफीवरून माणिकराव कोकाटे नेमके काय म्हणाले होते ?
पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं.