नोकरदार वर्ग, कामानिमित्त घरच्यांपासून वेगळे राहणारे लोक मेस च्या डब्ब्यावर अवलंबून असतात. आता मुंबईतील अशाच नोकरदारांना मात्र आता सहा दिवस डबा मिळणार नाहीये.
मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. आता त्या गावांमध्ये ग्रामदैवत/ कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार आहे. मंगळवार १५ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे.
उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेजला सुट्टी लागली आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची जास्त अडचण होणार नाही. खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची अडचण होईल. १८९० पासून मुंबईत डबेवाले सेवा देत आहेत. डब्बेवाल्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेली कोडींग प्रणाली २१ व्या शतकातही प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणतीही चूक न होता घरचा डबा मिळत असतो. सुरुवातीला ही साधी कोडिंग होती. परंतु आता मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हर्बल या ३ लोकल ट्रेन मार्गांसह व्यापक ट्रेन असल्याने कोडिंग अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टरमध्ये देखील विकसित झाले आहे.