१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका पोस्टद्वारे ही घोषणा केली. केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी १४ एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, हा निर्णय युपीएससी, सीव्हीसी, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि इतर महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना लागू राहील. या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांनाही सुटु जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. बी. आर. आंबेडकर ज्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हटले जाते, त्यांनी भारतीय संविधानाला आकार दिला आणि सामाजिक समानता आणि दलित आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक संघर्ष केला. १४ एप्रिल रोजी साजरी होणारी त्यांची जयंती ही केवळ त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचाच नाही तर त्यांच्या कल्पना आत्मसात करण्याचा आणि समावेशक समाजाच्या दिशेने पावले उचलण्याचा एक प्रसंग आहे. या वर्षी, १४ एप्रिल हा सोमवार असल्याने, देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये ही सुट्टी लागू असेल.
अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की या सुट्टीच्या काळात शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतील. ज्यामुळे लोकांना विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांचे स्मरण करता येईल. ही सुट्टी केवळ सुट्टीचा दिवस नाही तर समाजात जागरूकता, समानता आणि एकता वाढवणारा एक प्रसंग आहे. मोदी सरकारचे हे पाऊल डॉ. आंबेडकरांबद्दलचा गाढ आदर आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता दर्शवते, जेणेकरून देश त्यांची स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकू शकेल, असेही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.