दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली असून शुल्लक अशा कारणांवरून देखील अनेक गंभीर गुन्हे घडत असल्याचा घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उघडकीस आली असून केवळ हजार रुपयांसाठी एका व्यक्तीने आपल्या भावाचा निर्घृण हत्या केली असल्याची घटना घडली आहे.
दरम्यान,या आरोपीला कोर्टानं मोठी शिक्षा दिली आहे. प्रधानमंत्री योजनेचे एक हजार रुपये का दिले नाहीत, यावरून वाद घालत एका व्यक्तीने आपल्या भावाचा निर्घृण खून केला होता. २०२१ मध्ये घडलेल्या या प्रकरणात कोर्टानं निर्णय दिला आहे. लातूर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नागनाथ सुडके असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो लातूरजवळील कासारजवळा गावचा रहिवासी आहे. नागनाथ याने २४ ऑगस्ट २०२१ रोजी आपला भाऊ वैजनाथ सुडके याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्याने लाकडी दांड्याने भावाच्या डोक्यात वार केले होते. हा हल्ला इतका भयंकर होता की, वैजनाथ रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोषी नागनाथ सुडके याला दारुचं व्यसन होतं. ऑगस्ट २०२१ मध्ये मयताच्या खात्यावर प्रधानमंत्री योजनेचे दोन हजार रुपये मिळाले होते. यातील एक हजार रुपये नवनाथचे होते. पण भाऊ दारु पिऊन पैसे उडवतो, त्यामुळे मयताने हे एक हजार रुपये नागनाथची पत्नी अंजनाबाई यांच्याकडे दिले होते. याचा राग नागनाथला आला होता. त्यामुळे घटनेच्या दिवशी आरोपीनं आपल्या भावाच्या घरावर दगडाने हल्ला केला.