पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहेत. MPSC विद्यार्थ्यांकडून अनेकदा विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात येतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा पुणे शहरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
पुणे शहरात शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. पुणे येथील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परीक्षेतील जागा वाढवाव्यात, एमपीएससी वर्ग २ च्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. पीएसआय पदांमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या आंदोलनातही विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले. हे दोन्ही गट वेगवेगळ्या मागण्या करीत असून त्यांच्यात ताळमेळ नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य सहा मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यात संयुक्त गट ब व क २०२४ परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. तसेच एक्साईज एसआय पदांच्या जागा वाढवण्याची मागणी केली आहे. एसपीएस परीक्षांचे वेळापत्रक अनेकवेळा कोलमडते. यामुळे या सर्व परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजे, ही मागणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली. यूपीएससी प्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक होणार आहे. परंतु ही परीक्षा वर्णनात्मक नको, अशी मागणीही विद्यार्थी करत आहेत. क्लर्क परीक्षेचा निकाल लवकर लावावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली. आयोगातील काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचाही आरोप परीक्षार्थींनी केला आहे.
पुणे पोलीस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. आंदोलनासाठी परवानगी न घेता विद्यार्थी रस्त्यावर आले. तुमची मागणी संविधानिक मार्गाने मांडा रस्त्यावर बसून अडवू नका, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे डीसीपी संदीप गिल्ल यांनी सांगितले.
पुणे येथे एमपीएससीची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहे. राज्यभरातील विविध शहरांमधून येऊन दोन-तीन वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला वेळ देत आहे. परंतु त्यांना एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकांच्या घोळाचा फटका बसला आहे.