राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आता अनुदानाची रक्कम अखेर वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून थांबलेली अनुदानाची रक्कम अखेर वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 26,981 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 125.44 कोटी रुपयांपैकी 106.49 कोटी रुपये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 101.33 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या योजनेद्वारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि स्प्रिंकलर सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धतींना चालना देण्यासाठी 50 ते 100 टक्के अनुदान दिले जाते.
2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी सिंचन अनुदान योजनेचा लाभ घेतला असला तरी निधी वितरणाची प्रक्रिया रखडली होती. अखेर केंद्र सरकारकडून अनुदानाचा काही भाग मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.