मनमाड : प्रवासी रेल्वे गाडित नेहमीच प्रवाशांची गर्दी पहावयास मिळते तर प्रवासादरम्यान प्रवाशांची वस्तू, बॅग गाडित राहून गेल्याचे अनेक वेळा ऐकलं हि असेल मात्र हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवासी बॅगेने तिकीट तपासणीस, पोलिस, प्रवासी या सर्वांची एकच धावपळ उडवून दिली. बॅग कोणाची, त्यात काय आहे, याचा तपास लागत नसल्याने काहीशी भीती, शंका, उत्सुकता, संशय यात सारेच गुरफटले. मात्र, बॅगेचा मालक याच डब्यात सापडल्याने हा सस्पेन्स संपला आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जनशताब्दी एक्स्प्रेस संभाजीनगर स्थानकातून सुटल्यानंतर एका अनाहूत प्रवासी बॅगेने सगळ्यांना चक्रावून टाकले. ही बॅग दोन चेअर सीटच्या दरम्यान खाली ठेवलेली असल्याने तिकिट तपासणीसाने ती कोणाची, असे सर्वांना विचारले जवळच्या सीटवर बसलेल्यांनीही ही बॅग आमची नाही, असे सांगत गोंधळ अजून वाढवला. बॅगेचा मालक सापडत नसल्याने प्रवाशांतही गोंधळ वाढला. अनेक प्रवासी धास्तावले. रेल्वे मनमाड स्थानकात येईपर्यंत बॅगेचे गूढ कायम होते. कोणीही मालक समोर नसल्याने मनमाडला तिकीट निरीक्षकांनी थेट पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मग पोलिस रेल्वे बोगीत आले. त्यांनी या बॅगेची पाहणी केली. बॅगजवळच्या सीटवर बसलेल्यांची कसून तपासणी केली. त्यांचे तिकीट, ओळखपत्र सारे तपासले. बॅगेत काय आहे, हे पोलिसी खाक्यात विचारले. पण बॅग आपली नाही, हे सांगताना प्रवासीही भांबावले. मग मनमाडला रेल्वे असतानाच पोलिसांनी बॅग उघडण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण बोगीतले प्रवासी उभे राहून त्याकडे पाहू लागले. तेवढ्यात बोगीत बसलेला एक तरुण तेथे आला आणि त्याने ही बॅग माझी आहे, काय झाले? असे विचारले, तेव्हा सर्वांना हसावे की रडावे ते कळेना. पोलिसांनी इतक्या वेळ महाशय तुम्ही कुठे होते ? सगळ्यांना किती मनस्ताप झाला? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत बॅगेने बोगीत सर्वांना विविध भावरसांत कसे नाचवले, हे सांगितले.तेव्हा, मी या बोगीतच होतो. माझी बॅग चुकून येथे ठेवली गेली, असे त्याने सांगितले. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.पोलिसांनी मूळ मालकाला बॅग सांभाळा, ती जवळ घेऊन बसा, असा सल्ला देत ते ठाण्यात परतले व रेल्वे मनमाडहून नाशिककडे मार्गस्थ झाली. मात्र एका बॅगेची ही धमाल थेट मुंबईपर्यंत चर्चेचा विषय ठरली.