अलीकडच्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात अनेक बदल होत असून काही दिवसांपासून राज्यातील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान आता राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे अशी माहिती समोर आली आहे.
ऐन उन्हाळ्यात राज्यातवर अवकाळी संकट घोंघावत आहे. राज्यातील सर्वच भागांत हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 31 मार्च रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि इतरही काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती जाणून घेऊ.
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांना 31 मार्चसाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासर्व ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.