आजकाल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत असून हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यात हे सायबर क्राईम करणारे गुन्हेगार कमी वयाचे असल्याने देशाचे भवितव्य नेमके कसे घडणार असा सवाल उपस्थित होतोय अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
डिजिटल अरेस्ट प्रकरणात पुण्यातल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे, यातला एक जण पुण्यातला जिलेबी विक्रेता आहे. या दोघांनी मिळून मुंबईतील गृहिणीला डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून 10 लाख रुपये उकळले आहेत. पकडलेले दोन्ही आरोपी हे 20 वर्षांपेक्षा लहान आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या घरी घबाड सापडलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या घरातून बँकेची 13 पासबुक, चेकबुक तसंच 17 डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त केली आहेत.
डिजिटल अरेस्ट प्रकरणातली पीडित महिला ही 59 वर्षांची असून मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागात राहते. 15 जानेवारीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या महिलेला व्हॉट्सअॅपवर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने महिलेला तो खन्ना नावाचा पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, तसंच तिचं बँक खाते एका घोटाळ्यात वापरलं गेल्यामुळे गोठवलं जाणार असल्याची भीतीही दाखवली.
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगून आरोपीने महिलेला डिजिटल अरेस्ट केलं. यानंतर वकील म्हणून महिलेला दुसऱ्या व्यक्तीने फोन लावला. 15 ते 18 जानेवारीदरम्यान आरोपींनी महिलेवर ऑनलाइन पाळत ठेवली आणि तिला 9.75 लाख रुपये द्यायला सांगितले, यानंतर घाबरलेल्या महिलेने हे पैसे आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले, यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार नातेवाईकांना सांगितला.