राज्यातील घडामोडींना वेग आला असून प्रवाशांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आणखी सुखकर होणार असून 6 ते 7 तासांत होणारा प्रवास आता चक्क 2 तासांत होणार आहे अशी माहिती केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीये.
15 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून केंद्र सरकार पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक नवा महामार्ग बांधणार आहे. लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती दिलीये.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा एक महत्त्वपूर्ण महामार्ग असून त्यामाध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाणार आहे. राजधानी मुंबईसोबत संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेला आहे. तसेच पुण्यासोबत देखील संपूर्ण राज्याचे संबंध आहेत. त्यामुळेच एक नवा महामार्ग बांधण्यात येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.