पुरुषांवरील वाढत्या अत्याचारामुळे पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा  : तृप्ती देसाई
पुरुषांवरील वाढत्या अत्याचारामुळे पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा : तृप्ती देसाई
img
दैनिक भ्रमर
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिलांवर अत्याचाराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परंतु, आता दुसरीकडे पुरुष अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान आता  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी एक मोठी मागणी  केली आहे.

राज्यात पुरुषांवर अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

देसाई पंढरपूरला आल्या होत्या. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्या नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढत असताना दुसरीकडे पुरुषांवर देखील अत्याचार वाढत आहेत. यामुळे यापुढील काळात पुरुषांसोबतच महिलांनादेखील समुपदेशनाची गरज आहे. महिलांसाठी महिला आयोग काम करत आहे. मात्र अलीकडच्या काळात पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकारात त्यांना न्याय देण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही. यासाठीच पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

राज्यात अनेक क्षेत्रांत महिलांचा डंका आहे. राज्यातील सर्वच पक्षांत महिला आक्रमक आणि चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. पाच वर्षे महायुतीची सत्ता आहे. यामध्ये मुख्यमंत्री बदलू शकतात. राज्यात आजपर्यंत महिला मुख्यमंत्री झाल्या नाहीत. त्यामुळे भाजपाने मोठ्या मनाने एखादा महिलेस मुख्यमंत्री करावे, अशी मागणी देसाई यांनी केली. भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपद दिले तर आम्ही महिला म्हणून भाजपचे स्वागत करू असेही देसाई म्हणाल्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group