आजकाल अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अतिशय शुल्लक अशा कारणांवरूनही मोठ्या अघटित घटना घडल्याचे उघडकीस येत आहेत. दरम्यान, आता पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगलान शुल्लक अशा भांडणातून धक्कादायक पाऊल उचलले आहे.
क्षुल्लक कारणावर झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका प्रेमीयुगुलाने डिंभे धरण्याच्या डाव्या कालव्यातील पाण्यात उड्या मारल्याची घटना समोर आली आहे. दोघांचेही मृतदेह अद्याप सापडले नाही. ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी-टाकेवाडी दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता पारधी, पप्पू खंडागळे आणि त्यांच्या सोबत कविताच्या मामाची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिव्या राजाराम काळे असे तिघे जण मोटार सायकलहून टाकेवाडी येथील ठाकरवाडीकडे पहाटेच्या सुमारास येत होते. टाकेवाडी डाव्या कालव्या नजीक आल्यानंतर कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्यावरून भांडण झालं. भर रस्त्यावरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं.
त्यामुळे रागाच्या भरात कविताने पारधी हिने मागचा पुढचा विचार न करता कालव्यातील पाण्यामध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पप्पू खंडागळे यांनी उडी मारली. दोघांनाही पोहोता येत असल्याने ते बाहेर येतील, असं दिव्या काळे हिला वाटलं होतं. परंतु दोघेही काही वेळानंतर दिसेनासे झाल्यानंतर दिव्या काळे ही घाबरून जवळच राहणाऱ्या रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात येवून बसली. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आले असता त्यांना तिथे मुलगी दिसली. तिला तिचे नाव विचारले असता दिव्या काळे असं सांगितलं आणि तिने घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर चिखले यांनी यांनी गावातील लोकांना माहिती दिली. गावाचे पोलीस पाटील आणि इतर लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरात डाव्या कालव्याची पाहणी केली. पण पारधी आणि खंडागळे आढळून आले नाहीत. कविता पारधी आणि पप्पू खंडागळे यांनी कालव्यात कोणत्या कारणावरून उडी टाकली. याबाबत पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा सुरू होती. पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना झालेली घटना कळवली. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस आर मांडवे, संदीप कारभळ, पोलीस हवालदार संजय नाडेकर आणि पोलीस योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
डिंभे डाव्या कालव्याला ४०० क्युसेक्स वेगाने पाणी वाहत असल्याने बेपत्ता झाल्या दोघांचा शोध घेणे कठीण झाले आहे. यासाठी मंचर पोलीस ठाण्याने घोडेगाव तहसीलदारांना पत्र देऊन कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली आहे. या मागणी वरून डिंभे धरण यांना तहसील विभागाने पाणी कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार पाणी कमी केले जाईल. त्या नंतर शोध घेतला जाणार आहे.