राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून पक्षांतराच्या खेळी सुरूच आहेत. दरम्यान, अपक्ष खासदार खासदार विशाल पाटलांच्या एका वक्तव्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ निर्माण झाल्याचे दिसतेय.
सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील असतानाही काँग्रेस पक्षाने पडद्यामागू विशाल पाटील यांचे काम करून त्यांना निवडून आणले पण त्याच विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षबदलाची तयारी देखील दर्शवली आहे.
निमित्त होते, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या कार्यक्रमात विशाल पाटील यांचे भाषण भाव खाऊन गेले पण याच भाषणाने काँग्रेसजनांच्या पोटात गोळा आलेला आहे.
अपक्ष खासदार असलेल्या विशाल पाटील यांनी राहुल गांधी यांना भेटून इंडिया आघाडीला पाठिंब्याचे पत्र दिलेले आहे. मात्र त्याच विशाल पाटील यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून त्यासाठी पक्षबदलाची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, मी प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. आमचे शेजारी जयकुमार गोरेही पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. ते आज मंत्री झाले आहेत. मी देखील भविष्यात काँग्रेससोबत जाईन नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन आणि मंत्री होईल, आम्हालाही मंत्रिपदाची आशा आहे, असे विशाल पाटील म्हणाले.
शेवटी राजकीय प्रवास हा परिस्थितीनुरूप असतो. मतदारसंघाची कामे व्हावी लागतात. राजकारणात काम करत असताना आपला आसपासचा भाग, जिल्हा पुढे न्यायचा असतो, अशी पुष्टीही विशाल पाटील यांनी जोडली. 'मतदारसंघाचा विकास' हे लेबल लावून अनेक नेते पक्षबदल करतात, तशाच प्रकारची कारणे सांगून पक्षबदल करण्यासाठी विशाल पाटील यांनी मन बनवले आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.