दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल
img
Dipali Ghadwaje
मुंबई : शिवसेनेच्या आमदार भावना गवळी या आज विधान परिषदेत चांगल्याच आक्रमक झाल्या. दिशा सालियन प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी थेट मागणीच भावना गवळी यांनी केली. यावेळी भावना गवळी सभागृहात भाषण करताना प्रचंड आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या.

 भावना गवळी काय म्हणाल्या ?

"महिलांच्या हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काल ओझा नावाच्या एका वकिलाने स्टेटमेंट केलं, पत्रकार परिषद घेतली की, दिशा सालियन प्रकरणामध्ये कलम 376 लागू व्हायला पाहिजे होतं. सामूहिक अत्याचार झालेला आहे. या प्रकरणातील तपास कुठेना कुठे धिम्या गतीने होत आहे", असा आरोप भावना गवळी यांनी केला.

"सभापती महोदय, हा फार महत्त्वाचा विषय आहे. जे आरोप झाले आहेत ते अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. त्याबाबत या ठिकाणी ज्यावेळेला आमदार चित्रा वाघ, आमदार मनिषा कायंदे बोलतात त्यावेळेला विरोधी पक्षातील लोक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात.

आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी महिलांच्या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी उभ्या राहतो. त्यावेळेला हेतू पुरस्करपणे त्यांना कुणी सरडा म्हणून संबोधतं, कुणी 56 म्हणून संबोधतं", असं भावना गवळी म्हणाल्या.

"दिशा सालियन प्रकरणात जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेव्हा त्यावेळेला राज्य सरकारची आताची भूमिका काय आहे? हा जो ओझा नावाचा वकील आहे, त्याने पत्रकार परिषद घेतली आहे, 376 कलम दाखल करा म्हणून सांगितलं आहे, त्यासाठी आता कुठली चौकशी केली जाणार आहे? राज्य सरकार, आपलं सरकार, गृह मंत्रालय या प्रकरणावर कोणती कारवाई करणार आहे?", असे सवाल भावना गवळी यांनी केले.

'आदित्य ठाकरे नार्को टेस्टसाठी का तयार होत नाहीत?'

"कित्येक महिलांच्या प्रकरणांवरुन मंत्र्यांना राजीनामा द्यावे लागले आहेत. मंत्र्यांनी राजीनामे दिले तरी या प्रकरणाकडे का प्रकाश टाकला जात नाही? या प्रकरणाची का दखल घेतली जात नाही? या प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे नार्को टेस्टसाठी का तयार होत नाहीत?", असेदेखील सवाल भावना गवळी यांनी केले.

"हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाला दिशा द्यावी, अशी विनंती करते. गृहराज्यमंत्री इथे आहेत, त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यावी. काल जी पत्रकार परिषद झाली त्याची दखल घेतील का?", असेही प्रश्न भावना गवळी यांनी उपस्थित केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group