
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरु असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंचीच नसून आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेतो असही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. प्रकल्प आणि विकासकामांना देण्यात आलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देत समाचार घेतला आहे. तसेच आमचं सरकार हे समन्वयाने चालणारं सरकार आहे आणि आम्ही तिघे एकत्र मिळून निर्णय घेतो असंही स्पष्ट करत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 15 एप्रिलला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर 15 दिवसानंतर कोणी किती काम केले याचे मूल्य मापन करण्यात येणार आहे. ज्यांनी 50 टक्क्यांपेक्षा कमी केलं त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी काम चांगले केले त्यांचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने 1 मे ला करणार आहे.