
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले आहेत.
वाल्मीक कराड हा संतोष संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तो मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. यानंतर धनंजय मुंडें यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे खड्ड्यात जाऊ दे. या माणसाने असे प्रकार करू दिले. गेली 10 वर्षे असे गुन्हे चालू दिले आहेत. कोर्टाच्या ऑर्डर आल्या तरी देखील पोलिस तक्रार घेत नव्हते. हे सगळे फोटो व्हिडिओ बघून मनाचा थरकाप उडाला आहे. मनाला यातना होत आहेत.
देशमुख कुटुंबीयांवर काय बेतली असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इतक्या अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करताना हे हसताना दिसतात, यांच्यात जरा तरी माणुसकी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अशा प्रकारे परळीत अनेक हत्या झाल्या आहेत. जे कधी रजिस्टर झाले नाहीत आणि पोलिसांनी कधी लक्षही दिलेलो नाही. जो चौकशी आयोग नेमलेला आहे. त्याचा परीघ वाढवला पाहिजे. महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी उपोषणाला बसली आहे.
तिच्या बाजूला दोन छोटे मुले बसलेले आहेत. आम्ही मी आणि सुप्रियाताई भेटायला गेलो होतो. त्यामुळे दोन्ही मुले प्रचंड रडत होती. आपल्याच मनात कालवाकालव होती. आपण अशांना न्याय देऊ शकत नसेल तर काय उपयोग आपल्या कामाचा.