रोहित पवारांना मोठा धक्का ! अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड
रोहित पवारांना मोठा धक्का ! अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड
img
दैनिक भ्रमर
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून विधासभेपासून  महाविकास आघाडीला गळतीच लागली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आता पर्यंत काढता पाय घेतला आहे . दरम्यान,आता अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतमध्ये अविश्वास ठरावाआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता कर्जत नगरपंचायत भाजपाचे नेते राम शिंदे यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 नगरसेवक असलेल्या या कर्जत नगरपंचायतमध्ये भाजपाकडे स्वतःचे 2 आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेस यांचे 11 असे 13 नगरसेवक झाले आहेत.

कर्जत नगरपंचायत ही 17 नगरसेवक असलेली नगरपंचायत आहे. 2022 साली या नगरपंचायतीची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला तीन, तर भाजपला फक्त दोन नगरसेवक निवडून आणता आले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आणि नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली. मात्र तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ती भाजपच्या ताब्यात जात आहे. निवडणुकीत ज्याप्रमाणे राजकीय डावपेच आखत रोहित पवार यांनी भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. आता असेच राजकीय डावपेच मागील पंधरा दिवसांपासून भाजपाकडून खेळले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 पैकी 8 नगरसेवक आणि काँग्रेसचे तीनही नगरसेवक भाजपाच्या  गोटात दाखल झाले आहेत.

भाजपाच्या दोन आणि आघाडीतून बाहेर पडलेल्या 11 अशा 13 नगरसेवकांनी 7 एप्रिल रोजी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. यानंतर काही दिवसातच राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा अध्यादेश काढला. यावरून आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला.

दोन दिवसांपूर्वी तेरा नगरसेवकांनी नवीन अध्यादेशाप्रमाणे पुन्हा अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावर आज जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा घेऊन निर्णय करण्याचा आदेश दिला. मात्र कर्जत नगरपंचायतमध्ये सभा सुरू होण्याआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वसाधारण सभा न होता पिठासीन अधिकाऱ्याने नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती दिली.

उषा राऊत यांनी राजीनामा देत असताना आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. मात्र माध्यमांना बोलताना राऊत यांनी थेट सभापती राम शिंदे यांच्यावर आरोप करत पैसे आणि सत्तेच्या दबावात नगरसेवकांना अविश्वास ठराव आणण्यास भाग पाडला असल्याचा आरोप केला आहे. उषा राऊत यांनी आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर केलेला आरोपाचे खंडन करत नगरसेवकांच्या कोण किती विनवण्या करत होतं आणि कोण अमिष दाखवत होतं याचे सगळे पुरावे असल्याचे म्हटलं आहे. वेळप्रसंगी ते देखील बाहेर काढू असा इशाराही भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे भाजप गटात सहभागी नगरसेवकांनी नगराध्यक्षपद हे अडीच वर्षासाठीच दिलं होतं. मात्र स्वतःहून राजीनामा न दिल्याने आम्ही ही भूमिका घेतली असल्याचे म्हटलं आहे. यात कुठल्याही पैशाचा किंवा दबावाचा काहीही संबंध नाही, असे बंडखोर नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रयत्नाने कर्जत नगरपंचायत आमदार रोहित पवार यांनी ताब्यात घेतली होती. भाजपाच्या नगरसेवकांना त्यांन उमेदवारी दिली होती. मात्र ते नगरसेवक पुन्हा एकदा भाजपाच्या तंबूमध्ये दाखल झाल्याने रोहित पवार यांना राम शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा कर्जतसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group