ठाण्यातील भिंवंडीजवळील कारिवली परिसरात अज्ञात मारेकऱ्याने एका मुस्लिम व्यक्तीची कट रचून निर्घृणपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे . येथील खाडीशेजारील स्मशानामी पासून 500 मिटर अंतरावरील घनदाट जंगलातून 16 एप्रिल रोजी मयत व्यक्तीचा मृतदेह हाती लागल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार , फरहत अखलाक शेख असे हत्या झालेल्या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव असून या हत्येप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास केला असता गुन्हे शाखा घटक - 2 च्या पोलिस पथकाला मारेकऱ्याच्या कारिवली गावातील राहत्या घरातून मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. काजुकुमार रजेंदर राम (21) असे ताब्यात घेऊन अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.
अनैसर्गिक संबंधाच्या मागणीसाठी मयत फरहत हा मारेकरी काजूकुमार याला शिवीगाळ करत असल्याने त्याने या छळाला कंटाळून फरहतचं शीर धडापासून वेगळं करून निर्घृणपणे त्याची हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मागील तीन वर्षांपासून वडिलांसोबत कारिवली गावात राहत असून लूम कामगार म्हणून काम करत आहे. आरोपी काजूकुमार आणि मयत फरहत यांच्यात कामानिमित्ताने आधीपासूनच ओळख असल्याचेही काजूकुमार याने सांगितले.
हत्येनंतर गुन्हे शाखा घटक - 2 वरीष्ठ पोलीस निरिक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि श्रीराज माळी, पोउनि रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करताना घटनास्थळी भेट दिली होती.
पोलिसांनी आवश्यक माहिती प्राप्त करून त्यानुषंगाने कुठलेही भौतिक पुरावे नसतानाही गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे कौशल्यपूर्ण तपासात काजूकुमारने हत्या केल्याचे उघड केले.
आरोपी काजूकुमार त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळगावी पळून जाणार असल्याची माहिती पोलिस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
त्यानुषंगाने पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपी काजूकुमार यास कारिवली गावातील राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.