"या" ठिकाणी अजित पवारांची ताकद वाढणार ; ४ माजी आमदारांसह अनेक बडे नेते हातात घालणार 'घड्याळ'
img
Dipali Ghadwaje
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद चांगलीच वाढणार आहे. या निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. कारण जिल्ह्यातील चार माजी आमदारासह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात आज मुंबईत प्रवेश होणार आहे.

शिवाजीराव नाईक आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नाहीत. 

सांगलीतील या चारही बड्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत. राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला.

रवी तमन गौडा पाटील हे भाजपचे नेते होते. ते जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती होते. जतमधून त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले आणि त्यांचा पराभव झाला होता. आज ते देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत.

आज मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार आहे. पाचही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला जिल्ह्यात ताकद मिळाली.

आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे. दोन माजी आमदार आणि बडे नेते अजित पवार गटामध्ये जाणार असल्यामुळे शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का बसला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group