सिंघम म्हणून ओळखले जाणारे मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये "हिंद सेना" नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत लांडे यांचा हा पक्ष निवडणूक लढवणार आहे. शिवदीप लांडे यांचा पक्ष बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
उमेदवाराच्या विचारधारेला अनुसरणाऱ्यांनाच त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे लांडे यांनी सांगितले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील असले तरी ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते आणि व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते.
मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आपल्या कणखर आणि प्रामाणिक कामगिरीमुळे 'बिहारचा सिंघम' म्हणून ओळखले जातात. आता पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे आपल्या नवा पक्षासह नशीब अजमावणार आहेत.
शिवदीप लांडे हे २००६ च्या तुकडीचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी गेल्या वर्षी २२ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्णिया येथे महानिरीक्षक (आयजी) म्हणून कार्यरत असताना आपल्या सेवेतून राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.
अखेर, मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी लांडे यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष 'राष्ट्रवाद, सामाजिक सेवा आणि समर्पण' या तत्त्वांवर काम करेल. "आमचा पक्ष जनतेचा आवाज बनेल आणि बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध असेल."
लांडे यांनी आपला पक्ष बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, स्वतः निवडणूक लढवणार की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळले. "आमचे सर्व उमेदवार माझ्याच पाठिंब्याने लढतील.
प्रत्येक उमेदवारामागे शिवदीप लांडे यांचे नाव असेल," असे ते म्हणाले. पक्ष सध्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभरात जनसंपर्क मोहीम राबवत आहे.