सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्याने आणि सीआयडीने देखील त्याच्यावर आरोप निश्चिती केल्याने धनंजय मुंडे यांची कोंडी झाली होती. दरम्यान या प्रकरणावरून धंनजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आज राजीनामा दिला.

दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार आहे. राज्याचे कृषिमंत्री आणि नाशिकचा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सरकारी कोट्यातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याच दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी दोनही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील निकाल राखून ठेवत कोकाटे यांच्या विरोधातील वकिलांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली होती. काय निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावरतीच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की पद वाचणार? हे ठरणार आहे.