मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी काल भाजपने 3 उमेदवार जाहीर केल्यानंतर आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. यानुसार, काल भाजपकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यात संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे.
यानंतर आता विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना उमेदवारी मिळाली आहे. रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीत काम केले आहे. दोघेही उमेदवार आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.