अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही धमकी देण्यात आल्याचे समजते.
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही धमकी देण्यात आल्याचे समजते आहे.
अभिषेक घोसाळकर यांची एक वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन आरोपीने स्वत:देखील आपलं जीवन संपवलं होतं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी सुरु आहे. ही चौकशी सुरु असतानाच आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बोरिवली एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करत धमकी देण्यात आली आहे.
तेजस्वी यांच्यासोबतच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
एका व्हाट्सअप ग्रुपवर अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकत, 'लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद', अशा आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर व लालचंद पाल या दोघांनीही पोलिसांकडे तक्रार केली आहे.
तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. व्यावसायिक मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई याने घोसाळकर यांच्या बोरिवली येथील कार्यालयात फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वत:वर देखील गोळ्या झाडून घेतल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेनं हादरला होता.
लालचंद पाल कोण आहेत ?
लालचंद पाल हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक असून अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस भाई याने गोळ्या झाडल्या त्यावेळी ते घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे ते घोसाळकर यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहेत. आता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.