विधासभा निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागलेल्या महाविकास आघाडीला आता धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील अनेक मोठ्या नेत्यांसहित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आता एकनाथ शिंदे गटाकडून काँगेसला ही मोठा धक्का मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, धंगेकरांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांची घरवापसी झाली आहे. यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी काँग्रेस सोडण्याचं कारणही धंगेकरांनी सांगितलं.
'मी दहा वर्ष शिवसेनेचा नगरसेवक आणि विभाग प्रमुख होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही उपक्रम राबवले आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सर्वांना मिळून न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिला आहे. परत कुटुंबात आणण्यासाठी शिंदे साहेब यांनी प्रयत्न केले हे मी दोन महिन्यांपासून पाहतोय. पुण्यातले सर्वच नागरिक आम्ही तुमचे आभार मानतो. आम्हाला पक्षप्रवेश दिला आणि मोठे भाऊ म्हणून आम्हाला सामावून घेतलं. याच्यापुढे जो काही आदेश तुम्ही द्याल शिवसेनेचा नाव कमी होता कामा नये असं काम आम्ही करू. शिवसेनेचा उंचावण्याचं काम सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये करण्याचं काम आम्ही करू, असं यावेळी धंगेकर म्हणाले.