महाराष्ट्रतील राजकारण गेल्या काही दिवसांपासून 'ठाकरेमय' झालं होतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक कलहावर पडदा पडणार का? असे प्रश्न राजकारण्यांसह नागरिकांना पडला आहे.
सध्या ठाकरे बंधू परदेशी दौऱ्यावर आहेत. परतीनंतर ठाकरे बंधू युती करतील का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत पेजवरून शेअर केली असून, या पोस्टवरून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
ठाकरे पक्षाने एक्स अकाऊंटवर केलेली पोस्ट 'वेळ आली आहे, एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी', अशा आशयाची पोस्ट आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे ठाकरेंची शिवसेना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची साद घालत आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , या पोस्टसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माहिती घेतली असता, ही एक मोटिवेशनल पोस्ट आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी ही पोस्ट करण्यात आल्याची माहिती शिवसैनिकांकडून मिळाली आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं. मात्र, या पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.