राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिला कुठेही सुरक्षित नसून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने गावगुंडाना कंटाळून स्वतःचे आयुष्य संपविले आहे. ही धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली आहे. तू माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन, अशी धमकी दिल्याने बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द गावातील मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 15 वर्षांच्या या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षाही दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनिल हनुमंत खोमणे हे मागच्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते, तसंच मेसेज करून धमक्या देत होते.
माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेन, अशी धमकी आरोपींनी मुलीला दिली. तसंच चारही आरोपींनी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशतही निर्माण केली. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मुलगी कंटाळली होती.
7 एप्रिलला माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केलं नाहीस, तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 107, 78, 296, 352, 351 तसंच पोक्सो, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच पोलिसांनी आरोपी विशाल गावडे याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.