दिल्लीतील 2018 च्या बुराडी कांडाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना हरियाणाच्या पंचकूलामध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने पंचकूलामध्ये खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे हे कुटुंब देहरादूनचे रहिवासी होते. सर्व मृतदेह पंचकूलाच्या सेक्टर-27 मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार , प्रचंड कर्ज आणि आर्थिक तंगीमुळे व्यथित होऊन या कुटुंबाने हे भयानक पाऊल उचलले आणि गाडीत विष प्राशन केले. देहरादूनचे रहिवासी प्रवीण मित्तल (वय 42) आपल्या कुटुंबासह पंचकूलामध्ये आयोजित बागेश्वर धामच्या हनुमंत कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर देहरादूनला परतताना त्यांनी आत्महत्या केली.
मृतांमध्ये प्रवीणचे आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सर्व सात मृतदेह पंचकूलातील खासगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
पंचकूला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी अमित दहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाने नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.