मुंबई : मावशी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीची विल्हेवाट लावण्यासाठी निघालेल्या तरुणाला पार्क साईट पोलिसांनी वेळीच ताब्यात घेत चिमुकलीची सुखरूप सुटका केली.
याप्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली आहे. पार्क साईट पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सतीश ससाणे (४६) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

गांधीनगर जंक्शन येथे २४ तारखेला सायंकाळच्या सुमारास ससाणे यांना एक व्यक्ती मळकट कपड्यामध्ये काही तरी गुंडाळून पवईच्या दिशेने जाताना दिसला. त्याला थांबवून चौकशी करताच त्याने उडवाउडवीची उत्तर दिले.
गुंडाळलेल्या कपड्यामध्ये एक नवजात बालिका असल्याचे ससाणे यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत विचारताच मुलीला घेऊन मित्राकडे जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र संशय वाढल्याने त्यांनी पवई पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले.