राज्यात हुंडाबळीच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भक्ती गुजराथी या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एका विवाहितेने आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार , सासूकडून सतत होणारा छळ आणि नवऱ्याचे लक्ष नसल्यामुळे नैराश्येत जाऊन विवाहितीने टोकाचे पाऊल उचलले. या विवाहितीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये प्रेमविवाह केलेल्या २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. घरातील काम नीट करत नाही, जास्त बोलत नाही, सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून विवाहितेचा छळ सुरू होता. अशात ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून लग्न केलं तो नवरा लक्ष देत नसल्याने विवाहिता एकाएकी पडली. नैराश्येत येऊन या विवाहितेने लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच आयुष्य संपवलं.
विषारी औषध पिऊन विवाहितेने आत्महत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासू आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आडगाव पोलिस ठाण्यात विवाहितेच्या नवऱ्यासह सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवऱ्यासह सासूला अटक केली.
आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने सांगितले की, २७ मे रोजी भाग्यश्रीने मला फोन करत सासू आणि नवरा सारखे बोलतात. नवरा माझी बाजू घेत नाही. मी एकाएकी पडले आहे असे सांगून फोन बंद केला. त्याच रात्री नऊ वाजता तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. भाग्यश्रीच्या सासरच्यांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.