
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मामेसासर्यांकडे मुक्कामी आलेल्या भाचेजावयाने बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार म्हसरूळ परिसरात घडला.
फिर्यादी किशोर गोविंद क्षीरसागर (रा. वृंदावननगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) हे मामेसासरे असून, आरोपी जीवन तानाजी तलवारे (वय 26, रा. कोपुर्ली, ता. पेठ, जि. नाशिक) हा नात्याने त्यांचा भाचेजावई आहे. दरम्यान, दि. 17 ते 18 मे रोजी आरोपी जीवन तलवारे हा मामेसासरे यांच्या घरी साईनिर्मल पंढरी अपार्टमेंट येथे आला होता.
रात्री आरोपी व त्याचे मामेसासरे फिर्यादीच्या बेडरूममध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास भाचेजावयाने बेडरूममधील कपाटात ठेवलेले 1 लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीचा दीड तोळे वजनाचा नेकलेस, 30 हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची चेन, 65 हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी व 3 लाख 60 हजारांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
याप्रकरणी म्हसरूळ तालुक्यात भाचेजावयाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.