
२१ मे २०२५
इगतपुरी :- जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला लागलेली आग मागील सोळा तासापासून कायम आहे. आज सायंकाळी प्रशासनाने कंपनीच्या लगत असलेला परिसर खाली केलेला आहे.
आज सकाळी थोड्या फार प्रमाणात आग आटोक्यात आली होती. मात्र सायंकाळी या आगीने पुन्हा रौद्ररूप घेतले. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेला १६ तास उलटून देखील आगीची धग कायम आहे.
१५ पेक्षा अधिक अग्निशमन दलाची वाहन सातत्याने पाण्याचा आणि फोमचा मारा करत आहे. तरीदेखील कंपनी परिसरात असलेला कच्चामाल आणि ज्वलनशील पदार्थ त्याचबरोबर प्लास्टिकमुळे ही आग वाढत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.
आगी बरोबरच स्फोटांच्या आवाजामुळे देखील परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिंदाल कंपनीची आग वेगाने वाढत असल्याचे पाहुन खबरदारीचा उपाय म्हणून कंपनी परिसर खाली करण्यात येऊन सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.
या कंपनीत हजारो परप्रांतीय कामगार असून त्यांना बाहेर काढल्यामुळे मिळेल त्या गाडीने कामगार गावाकडे परतत असताना दिसुन आले.
नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर, भिवंडी, जिल्ह्यातूनही अग्नीशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. सातत्याने शर्तीचे प्रयत्न सुरू असून अजून पर्यंत ही आग सुरूच आहे त्यामुळे प्रशासन आता नियंत्रण मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहे
Copyright ©2025 Bhramar