
नाशिक - आज सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसामुळे सिन्नर तालुक्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर इगतपुरी येथे एक जण वीज पडल्यामुळे जखमी झाला आहे.
मागील दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत यावेळी मोसमी पावसाने जिल्ह्यामध्ये तीन जणांचा बळी घेतला होता.
आज तीन वाजेनंतर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामध्ये सिन्नर तालुक्यातील मापारवाडी येथे बारा वर्षीय विकास रामनाथ बर्डे हा घराबाहेर उभा असताना अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील नळवाडी येथे असणारे शेतकरी रामदास दगू शहाणे वय 35 हे दुपारी झालेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये विजेच्या तारेचा शॉक लागून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इगतपुरी तालुक्यातील पारदेवी येथे लालचंद देवराम सदगीर हे पन्नास वर्षीय व्यक्ती म्हैस चारत असताना अंगावर विज पडल्याने जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.