नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दिवसभर कंपनी मध्ये करून घरी परतणाऱ्या कामगारांच्या दुचाकीला भरधाव कारने जबर धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना शिंदेगाव टोलनाक्याजवळ रात्री घडली.
रवींद्र नामदेव गायधनी, शंकर मेरखांब आणि तेजस चंद्रमोरे हे तिघे सिन्नर येथील कंपनीत काम करून MH 15GH 0283 वरून घरी परतत होते. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. मागून भरधाव वेगात आलेल्या कारने (MH 15 JK 0064) त्यांना जोरदार धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की, रवींद्र गायधनी गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर मार बसल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांच्या जीवनाची ज्योत मालवली.
या दुर्घटनेत शंकर मेरखांब आणि तेजस चंद्रमोरे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर नाशिकरोड पोलिसांनी कार चालक आशिष कलंत्री याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
रवींद्र गायधनी याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या तरुणाचा अकाली मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा आघात आहे.