वीज कोसळून निफाडला नारळाचे झाड जळून खाक; पावसाची दमदार हजेरी
वीज कोसळून निफाडला नारळाचे झाड जळून खाक; पावसाची दमदार हजेरी
img
दैनिक भ्रमर
 
निफाड ( प्रतिनिधी ) निफाड परिसरामध्ये दिनांक सहा मे रोजी सायंकाळी चार वाजे पासून वादळी वारे आणि जोरदार पावसाने हजेरी लावली.

विजांचा कडकडाटा सह मेघ गर्जनांमुळे झालेल्या या पावसामुळे वातावरण अगदी बदलून गेले होते.  कडाक्याचे ऊन आणि असह्य उष्णते मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे हायसे वाटले. 

 निफाड येथील संभाजीनगर हायवे परिसरात असलेल्या अजय गोळे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणाचीही जीवित हानी झालेली नाही.

दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या  पडल्याचे वृत्त आहे. झाडे कोसळल्यामुळे ठीक ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला होता.

निफाड तालुक्यात सर्वत्र या वादळी पावसाने हजेरी लावलेली होती अनेक ठिकाणी हलक्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याचे वृत्त आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कसलाही रागरंग नसताना अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे  कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि कांदा व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

सध्या कांदा काढणीचा साठवणुकीचा हंगाम सुरू असल्याने या पावसाच्या तडाख्यापासून होणारे कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी सर्वांची एकच धांदल झाली. हवामान तज्ञांनी अजून दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group