नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण दि. 31 रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने दि. 30 रोजी ईदच्या खरेदीसाठी होणारी गर्दी व 31 रोजी गोल्फ क्लब मैदानावर नमाजपठण होत असल्याने शहरातील काही मार्गांवरून जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील. हा बदल लक्षात घेऊन नाशिककरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (मुख्यालय-वाहतूक) यांनी केले आहे.
दि. 30 रोजी रमजान ईदच्या खरेदीसाठी दूध बाजार, चौक मंडई परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 30 रोजी दुपारी 3 ते मध्यरात्रीपर्यंत दूध बाजार परिसरातील दूध बाजार चौक (अब्दुल हमीद चौक) ते फाळके रोड टी पॉईंट (हॉटेल हाजी दरबार) पर्यंतच्या रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी राहील. या रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांनी भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड येथून पिंपळ चौक मार्गे त्र्यंबक पोलीस चौकी व गाडगे महाराज पुतळामार्गे इतरत्र जा-ये करायची आहे.
फाळके रोड टी पॉईंट ते चौक मंडई हा रस्तादेखील बंद राहणार असून, वाहनचालकांना फाळके टी पॉईंट येथून सारडा सर्कलमार्गे इतरत्र जाता येईल.चौक मंडई ते महात्मा फुले पोलीस चौकी हा रस्तादेखील बंद राहणार असून, या रस्त्यावरून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल व टाळकुटेश्वर पूल मार्गे वळविण्यात आली आहे.
रमजान ईदचे नियोजन
रमजान ईद सण दि. 31 रोजी साजरा होणार असून, चंद्रदर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे होऊ शकतो; मात्र ईदच्या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विविध मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहील.मुंबई नाका ते गडकरी सिग्नल रस्त्यावर वाहतूक बंद राहणार असून, वाहनचालकांनी संदीप हॉटेलजवळ उजवीकडे वळून गुरुद्वारा रोडमार्गे इतरत्र जा-ये करायची आहे.
सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल अर्थात जुने सीबीएस ते त्र्यंबक नाका हा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहनचालकांनी सीबीएस सिग्नलमधून टिळकवाडी मार्गे किंवा कान्हेरेवाडी मार्गे इतरत्र जा-ये करायची आहे.
मायको सर्कल ते जलतरण तलाव हा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहनचालकांनी मायको सर्कलकडून जलतरण चौकात डावीकडे वळून टिळकवाडी मार्गे किंवा मायको सर्कलकडून धामणकर कॉर्नरवर उजवीकडे वळून आपापल्या मार्गाने जायचे आहे.
ईद सण चंद्रदर्शन न झाल्याने एक दिवस पुढे-मागे झाल्यास त्यानुसार वरील रस्त्यांवरील वाहतूक बंद राहील; मात्र पोलीस सेवेतील वाहने, अत्यावश्यक सेवेची वाहने आदींना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.