नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- डोंगर व टेकडी खोदण्यास परवानगी देणार नसून जो कोणी अवैध उत्खनन करेल त्याच्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल जर प्रशासनाने यावर हलगर्जीपणा केल्यास शासन म्हणून मी स्वतः त्यावर कारवाई करेल असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त येथे महसूल, मुद्रांक व भूमी अभिलेख विभागाची बैठक घेण्यात आली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी यावेळी राज्य सरकारच्या योजना अधिकारी यांना सांगून त्यांचे मत नोंदवले, त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तक्रारदार यांचे अर्ज स्वीकारून त्यावर कारवाई केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी डोंगर, टेकडी चे अवैध उत्खनन केले जात असल्याचे विचारले असता त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत परवानगी देण्यास नाही सांगितले असून जो कोणी अवैध उत्खनन करीत असेल त्यावर पाच पट दंड आकारणी करावी व या भागात उत्खलन होत आहे त्या भागाचा डोंगरे सर्वे करावा असा आदेश त्यांनी महसूल आयुक्त प्रविण गेडाम यांना दिला. जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर सरकार म्हणून मी स्वतः कारवाई करेल असा गर्भित इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला.
यानंतर सरकार प्रत्येक जिल्ह्यात 50 खडी क्रेशर मशीन मोफत देणार असून पाच एकर जागा शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उत्खलन करून तेथील दगडांपासून कृत्रिम वाळू म्हणजे सेंड तयार करणार असून पाच एकर चा भाग खोदून झाल्यानंतर तो जलसंधारण विभागाकडे वर्ग करून त्या ठिकाणी पाण्यासाठी तळे निर्माण करणार असल्याचे कल्पना शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात अनेक कृत्रिम तलाव तयार होतील.
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वर्ग होत असल्याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी सांगितले की, विरोधक जनतेला कन्व्हेन्स करू शकत नसल्याने ते कन्फ्युज करीत आहे.खोटी माहिती समाजात पसरवण्याचा काम विरोधक करीत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी स्वातंत्र्य निधी तयार असून आदिवासी व सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कोणीही हात लावू शकत नाही.त्यांचा निधी त्या वर्गासाठी वापरला जाईल.
महिन्याभरात अवकाळी पावसाने थैमान घातले असून यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने होत आहेत. आज पर्यंत ८० टक्के पंचनामे झाले असून २०टक्के पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे पक्ष पालकमंत्री पदासाठी आग्रही असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मागणी करण्यात आलेली आहे की नाशिकचे पालकमंत्री पद भाजपाला मिळावी. त्यासाठी सरकारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपा हा प्रश्न समन्वयाने मार्गी लावतील व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा लवकरच तिढा सुटेल,असे बावनकुळे यांनी सांगितले.
न्यायालयाने महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याबाबत आदेशित केले असल्याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, पावसाळ्याचे दिवस संपले की तात्काळ विधानसभेप्रमाणे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांच्या निवडणुकीचे रणसंग्राम दिसेल. या निवडणुकीमध्ये भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आम्ही महायुती म्हणून सोबत लढू.
ज्या जिल्ह्यात काही अडचणी निर्माण झाल्यास त्या समन्वयाने सोडवण्याचा प्रयत्न करू, मात्र निवडणुका सोबत लढू व प्रत्येक महानगरपालिकेवर महापौर, जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, पंचायत समितीवर सभापती व ग्रामपंचायतीवर सरपंच हे महायुतीचेच असतील.
मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर असेल, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेले रस्ते,भुयार मार्ग,बोगदे यामुळे नागरिक समाधानी असून महायुती मागे नागरिक खंबीरपणे उभे राहतील आणि संपूर्ण सत्ता ही महायुतीच्या पारड्यात पडेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येऊन युती करून निवडणूक लढवतील याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी सांगितले की राज ठाकरे, उद्धव ठाकरे प्रगल्भ नेते आहेत ते व त्यांचा पक्ष याबाबत निर्णय घेईल मी यामध्ये बोलण्याचा काही एक संबंध नाही 51% महायुती जिंकण्याची क्षमता आमची आहे. त्यामुळे ते एकत्र लढले किंवा स्वतंत्र लढले तर महायुतीला कुठलाही फरक पडणार नाही.
राज्याच्या मंत्री मंडळात छगन भुजबळ यांना स्थान दिल्याबद्दल बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा अनुभवाचा फायदा सरकारला होईल. नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा त्यांचा मोठा कार्यकाळ झालेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना संधी दिल्याने राज्याला त्याचा फायदा होईल, मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणे हा त्यांच्या पक्षाचा संबंध आहे. भाजपाचा काहीही संबंध नाही. सरकारमधील तिन्ही पक्षाला कोटा दिलेला आहे, त्याप्रमाणे मंत्री पद कोणाला द्यायचे हा अधिकार त्याच्या त्या पक्षाच्या प्रमुखाला आहे.
पत्रकार परिषदेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमातून आलेल्या जवळपास 64 निवेदन व तक्रारी स्वीकारली. त्यावर त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन त्या तक्रारी व निवेदनाची दखल घेण्यास सांगितले. यावेळी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, विभागातील जिल्हाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.