
चंद्रशेखर गोसावी / भास्कर सोनवणे
इगतपुरी - तालुक्यातील जिंदाल कंपनीला लागलेली आग मागील सुमारे 38 तासांपासून सुरूच आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गॅसचा स्फोट होऊ नये यासाठी म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असून खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूची सुमारे सात गावे खाली करण्यात आली आहेत.
या ठिकाणी एनडीआरएफची तुकडी देखील मागविण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या रॉ मटेरियलला लागलेल्या आगीने रुद्र रूप धारण केले असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नाशिक महानगरपालिकेसह ओझर, सैन्यदल, ओझर वायुदल, यासह भिवंडी पिंपरी चिंचवड संगमनेर, अहिल्यानगर या ठिकाणावरून देखील आगीचे बंब मागविण्यात आले होते. काल सायंकाळपर्यंत ही आग नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाला वाटत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा ही आग भडकली आहे.
या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाकीचा स्फोट होण्याची शक्यता गृहीत धरल्यामुळे आजूबाजूच्या सुमारे सात पेक्षा अधिक गावे ही खाली करण्यात आलेली आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ थांबविण्यात आलेली आहे.
या आगीत जिंदाल कंपनीतील एक पूर्ण प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जात आहे. नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी सांगितले की, सर्वात धोक्याची बाब म्हणजे कंपनीच्या आवारात LPG टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये यासाठी सतत पाणी व फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या टाकीला जर आग लागली, तर मोठा स्फोट होऊन गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी झाल्याचे कळतंय . 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या परिसरात दाखल झाल्या आहेत.