इगतपुरी - घराच्या छतावर मुसळधार पावसाचे साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करतांना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले.
यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले. या घटनेत २५ वर्षीय युवकाचा खून झाला आहे. याप्रकरणी ६ जणांवर खुनाचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून कुरापत काढली. प्रविण मश्चिंद्र भटाटे, वय २९, रा. टिटोली याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाईटसाईट शिवीगाळ केली. आरोपी राजेंद्र बाबुराव भटाटे, दिपक राजेद्र भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामु उर्फ दिनेश मश्चिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेवुन खाली पाडत मारहाण केली.
या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यांने त्याच्याजवळील असलेला चाकु त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला. आरोपी रमेश भटाटे यांने फिर्यादीचा भाऊ दिनेश मश्चिंद्र भटाटे याच्या छातीचे मधोमध चाकु खुपसून त्यास जिवे ठार मारले. फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करीत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे यानें फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली, अशी फिर्याद दिली.
इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे, रमेश ज्ञानेश्वर भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, दिपक राजेद्र भटाटे, राजेंद्र बाबुराव भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व रा. टिटोली, ता. इगतपुरी जि नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु करण्यात आला असून ह्या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे.