मनमाड (प्रतिनिधी) :- भारत-पाकिस्तान दरम्यान उद्भवू शकणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार राज्यातील १६ संवेदनशील शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून, मनमाड शहराचा देखील त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या (ता. ७ मे) मनमाड शहरात विविध ठिकाणी मॉक ड्रिल पार पडणार आहे.
मनमाड हे औद्योगिक आणि वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण असून, येथे पानेवाडी परिसरात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत गॅसचे बॉटलिंग प्लांट आहेत. तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धान्य गोदाम आणि देशातील प्रमुख रेल्वे जंक्शन याठिकाणी कार्यरत आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता मनमाडला संवेदनशील शहर म्हणून निवडण्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील ठिकाणे असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर उद्या मनमाडमध्ये विविध ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे.
मनमाड नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीने मॉक ड्रिलसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मॉक ड्रिलचा प्रारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीवरून सायरन वाजवून करण्यात येणार आहे.
त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग आणि इतर आपत्कालीन यंत्रणांचे समन्वय साधून विविध ठिकाणी प्रत्यक्ष कृती केली जाणार आहे.
या मॉक ड्रिलच्या वेळी कोणीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना केले आहे. ही केवळ तयारीची एक चाचणी असून, कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.