
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खासगी सावकार कुंडलवाल पितापुत्राचे अनेक प्रकार समोर येत असून, व्याजाने पैसे दिलेल्या दोन कर्जदारांना धमकावून त्यांच्या जमिनीची कागदपत्रे बळजबरीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करूनही त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खंडणीचा पहिला प्रकार पंचवटी परिसरात घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 5 मार्च 1999 ते नोव्हेंबर 2024 यादरम्यान फिर्यादी यांनी खासगी सावकार आरोपी कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल (तिघेही रा. पंचवटी) यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. कुंडलवाल पितापुत्रांनी फिर्यादीकडून विनापरवाना अवाजवी व्याजाची मागणी करून आजपर्यंत व्याजापोटी व व्याजाच्या हप्त्याची तारीख चुकली म्हणून दंडापोटी व खंडणीवजा व्याजाची रक्कम म्हणून एकूण 80 लाख रुपये घेतले असून, मुद्दल, व्याज व दंड व व्याजाची आणखी 50 लाख रुपयांची मागणी कुंडलवाल यांनी फिर्यादीकडे केली.
फिर्यादीच्या पत्नीच्या माहेरच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचे जबरदस्तीने खासगी सावकार कुंडलवाल याने त्याच्या आईच्या नावे मुखत्यारपत्र करून घेऊन ही जमीनही त्याच्या सासूच्या नावे करून घेतली. एवढेच नव्हे, तर कैलास कुंडलवाल याने फिर्यादीच्या मुलासह मुलीला किडनॅप करून मुलीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याचप्रमाणे फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भुत्याणे (ता. चांदवड) येथील जमीनही जबरदस्तीने नावावर करून घेतली,.
तसेच आरोपी कैलास कुंडलवाल याने फिर्यादीच्या पत्नीच्या फंडाचे पैसे तिला भीती घालून स्वत:कडे घेतले, तसेच फिर्यादीची पत्नी घरी असताना आरोपी कैलास कुंडलवाल याने तिला व्याजाच्या रकमेकरिता शिवीगाळ करून तिला अश्लील शब्द वापरून “माझे व्याजाचे पैसे परत कर,” असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्याचे केस धरून कुंडलवाल याने महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून घेऊन तिला ढकलून दिले.
एवढेच नव्हे, तर आरोपीने बळजबरीने घरात घुसून फिर्यादीच्या मुलास मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीचे सेवानिवृत्तीचे दहा लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडून अवाजवी व्याजाची वसुली करण्याकरिता फिर्यादीच्या पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यास व कर्ज काढून, तसेच पत्नीचे दागिने गहाण ठेवून व एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढून व्याजाचे पैसे व सेवानिवृत्तीचे पैसे देण्यास भाग पाडले.
आरोपी रोहित कुंडलवाल याने फिर्यादीस मारहाण करून “आमचे पैसे परत कर,” असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीसमोर अश्लील वर्तन करून व पिस्तुलाचा धाक दाखवून हाताच्या ठोशाने मारहाण करून जखमी केले. आरोपी रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल याने फिर्यादीच्या मुलाची सोन्याची अंगठी व तीन लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच जोपर्यंत आमचे 50 लाख रुपये तुम्ही देत नाहीत, तोपर्यंत तुमची भुत्याणे येथील जमीन तुम्हाला परत करणार नाही, तसेच तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खासगी सावकार कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
गंगापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
खंडणीचा दुसरा प्रकार कृषीनगर येथे घडला. फिर्यादी यांनी आरोपी कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल (तिघेही रा. उदय कॉलनी, पंचवटी) व दया कुमावत यांच्याकडून 49 लाख 36 हजार रुपये काही कामासाठी व्याजाने घेतले होते.
दरम्यान, दि. 15 जुलै 2024 ते 13 मार्च 2025 या कालावधीत खासगी सावकार कुंडलवाल पितापुत्रांनी फिर्यादीच्या राहत्या घरी, तसेच बिग तवा हॉटेल, कॉलेज रोड, कृषीनगर येथे फिर्यादी यांनी घेतलेल्या रकमेवर विनापरवाना अवाजवी व्याजाची मागणी करून फिर्यादीकडून व्याजापोटी व व्याजाच्या हप्त्याची तारीख चुकली म्हणून दंडापोटी असे एकूण 52 लाख रुपये घेऊनही मुद्दल, व्याज व दंड धरून आणखी 64 लाख 36 हजार रुपयांची मागणी केली, तसेच आरोपी खासगी सावकार रोहित कुंडलवाल याने फिर्यादी यांच्या घरी येऊन “जर तुझ्या नवऱ्याने पैसे दिले नाहीत आणि तो जर नाशिकमध्ये दिसला, तर त्याला माझ्याकडील पिस्तुलाने गोळी घालून ठार मारीन,” अशी धमकी देऊन रोहित कुंडलवाल याने फिर्यादीच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिच्या कमरेवर लाथ मारून निघून गेला, तसेच फिर्यादीच्या बिग तवा हॉटेल येथे त्यांच्या फोर्ड कंपनीच्या एमएच 20-6800 या क्रमांकाच्या एन्डेव्हर कारने येऊन आरोपी रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल या दोघांनी फिर्यादीस पिस्तूल दाखवून “तू आताच्या आता मुद्दल, व्याज व दंड असे एकूण 64 लाख 36 हजार दे. नाही तर तुला ठार मारीन,” अशी धमकी देऊन शिवीगाळ करून आरोपी निखिल कुंडलवाल याने फिर्यादीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर रोहित कुंडलवाल याने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून त्याच्याकडील पिस्तूल दाखवून 64 लाख 36 हजार रुपयांची मागणी केली, तर आरोपी कैलास कुंडलवाल व निखिल कुंडलवाल यांनी फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. या अंगठ्या काढताना फिर्यादीने विरोध केला असता त्याला रोहित कुंडलवाल याने पिस्तुलाच्या मुठीने मारून जखमी केले. मोबाईल क्रमांकावरून आरोपी निखिल कुंडलवाल याचा मेहुणा दया कुमावत असे नाव सांगून फिर्यादीकडे व्याजाच्या रकमेची मागणी केली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध कुंडलवाल बापलेकासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.