
८ एप्रिल २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अमित वाईन्सचा परवाना साडेसहा कोटी रुपयांत विक्री करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून वेळोवेळी पैसे घेऊन सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अमित सानप (रा. अशोका मार्ग, नाशिक), संदीप सुर्वे (रा. जेलरोड, नाशिकरोड) व नटेश शिंदे (रा. मुंबई) या तिघांनी संगनमत करून सन 2023 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने फिर्यादी मनीष गोपालदास व्यास (वय 49, रा. लखडगंज, नागपूर) यांचा विश्वास संपदन करून अमित सानप याच्या नावाच्या अमित वाईन्सचा परवाना साडेसहा कोटी रुपयांत विक्री करण्याचे आमिष दाखविले. त्यावर फिर्यादीचा विश्वास बसला.
त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून वाईन परवाना विक्रीपोटी वेळोवेळी बँकेद्वारे व रोख स्वरूपात एकूण 1 कोटी 42 लाख 50 हजार रुपये घेतले; मात्र फिर्यादीशी ठरलेला व्यवहार पूर्ण न करता किंवा त्यांच्याकडून घेतलेली रक्कम त्यांना परत न करता पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar