
११ एप्रिल २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आम्ही या एरियाचे भाई असून, तर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही, तर तुमचे दुकान चालू देणार नाही, असे म्हणत गल्ल्यातील आठ हजार रुपये बळजबरीने काढून घेत दुकानावर दगडफेक करणार्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी अमोल पंडित यांचे सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ नानाज् कॉर्नरनजीक किराणा दुकान आहे. काल (दि. 10) त्या दुकानात असताना त्याच परिसरात राहणारा आरोपी कुणाल सूर्यवंशी हा आला. त्याने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून दुकानाच्या काऊंटरला लाथा मारून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी दुकान बंद करीत असताना आरोपी कुणाल सूर्यवंशी व कृष्णा चव्हाण हे दोघे जण फिर्यादीच्या दुकानावर आले.
“आम्हाला हप्ता का देत नाही? आम्ही या एरियाचे भाई आहोत. हप्ता दिला नाही, तर दुकान चालू देणार नाही, तसेच तुझ्या नवर्याला जिवे ठार मारू,” अशी धमकी देत दुकानाच्या काऊंटरची काच फोडून दुकानातील गल्ल्यातून सात ते आठ हजार रुपये बळजबरीने काढून घेत दुकानावर दगडफेक करीत निघून गेले. तसेच तेथे उभ्या असलेल्या लोकांना शिवीगाळ करून “तुम्हा सर्वांचा बेत पाहतो,” अशी धमकी देऊन पळून गेले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar