नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हातउसनवार घेतलेल्या पैशांच्या व्याजापोटी बेकायदेशीर पद्धतीने खंडणीवजा अवाजवी व्याजाची रक्कम 20 लाख रुपये जबरीने घेऊन पुन्हा साडेतीन लाख रुपये जबरीने घेऊन जाणारा खासगी सावकार व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही अंबड एमआयडीसी येथे स्वर्ण लघुउद्योग येथे खासगी नोकरी करते. फिर्यादी यांनी आरोपी नितीन पाटील याच्याकडून हातउसनवार व्याजाने पैसे घेतले होते. नितीन पाटील व त्याचा साथीदार तुषार व त्याच्यासोबतच्या चार ते पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्याकडून या पैशांच्या व्याजापोटी बेकायदेशीर पद्धतीने खंडणीवजा अवाजवी व्याजाची रक्कम म्हणून 20 लाख रुपये जबरीने वसूल केले आहेत.
तसेच फिर्यादी महिलेला मारहाण करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून अपशब्द वापरले, तसेच महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने हिसकावून घेतले, तसेच फिर्यादी महिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन दुसर्या दिवशी पुन्हा साडेतीन लाख रुपये जबरीने घेऊन गेले, तसेच फिर्यादीच्या पतीकडून जबरीने आयसीआयसीआय व टीजेएसबी बँकेचे 28 चेक लिहून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला जबरीने अवाजवी व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी फिर्यादीच्या पतीस अंबड एमआयडीसीमधील हलसन कंपनीच्या बाहेर बोलावले व जबरीने गाडीवर बसवून पाथर्डी फाटा येथे आणून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या पतीला आरोपी नितीन पाटील, त्याचा साथीदार तुषार व त्यांच्यासोबतच्या चार ते पाच अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. हा प्रकार सन 2018 ते 1 एप्रिल 2025 यादरम्यान अंबड एमआयडीसीत घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नितीन पाटील व त्याच्या साथीदारांविरुद्ध सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे करीत आहेत.