
८ एप्रिल २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करणार्या नोकरानेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे 2 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार विनयनगर येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी फिलोमिना ओमप्रकाश शर्मा (वय 60, रा. विनयनगर, नाशिक) यांच्या घरी आरोपी अर्जुनसिंग भोपालसिंग चौहाण हा गेल्या 15 ते 16 वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान आरोपी चौहाण याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. दि. 10 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चौहाण याने फिर्यादी शर्मा यांच्या घरातून 1 लाख 20 हजार रुपये किमतीची चार तोळ्यांची सोन्याची चेन, 60 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे कडे, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 50 हजार रुपयांची रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड असा 2 लाख 35 हजारांचा ऐवज फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेला.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित अर्जुनसिंग चौहाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar