मनमाडला
मनमाडला "त्या" विहरीत इंधन गळती नव्हे ; "हा" प्रकार आला उघडकीस
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मनमाड - येवला रोडवरील अनकवाडे शिवारातील एका विहिरीमध्ये डिझेलसदृश पदार्थाचा तवंग आल्याची चर्चा होत असताना इंधन चोरीसंबंधीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई-मनमाड-बीजवासन या उच्चदाब इंधनवाहिनीला छिद्र पाडून अनधिकृतरित्या इंधन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेमुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरापासून जवळ असलेल्या अनकवाडे शिवारातील करुणा केअर सेंटरच्या मागील बाजूस असलेल्या संपत चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत डिझेलसदृश पदार्थाचा तवंग आढळून आले.

घटनास्थळाजवळून बीपीसीएलची मुख्य इंधनवाहिनी जात असल्याने संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल होत इंधनाची गळती शोधण्याची मोहीम तातडीने हाती घेतले. 

संबंधित अधिकाऱ्यांनी विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले आणि सुमारे १ किलोमीटरच्या लांबीतील पाईपलाईनवर माती उकरून तपासणी केली. प्रारंभी लिकेज सापडले नाही, मात्र पुढील तपासणी दरम्यान शेजारील ओढ्यातील पाईपलाईन तपासली असता, चेनेज (CH) २४३.३०० किमी वर इंधनवाहिनीला छिद्र करून दीड इंची जीआय पाईप टाकल्याचे उघड झाले.

सदर पाईप सुमारे ४८ फूट लांबीचा असून तो जमिनीत पुरण्यात आला होता. असे आर.ओ.यू. अनज नितीन धर्मराव (वय ३३) यांनी या घटनेबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अनधिकृत छिद्राद्वारे इंधन चोरीचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधितांवर पेट्रोलियम आणि खनिज पाईपलाईन अधिनियम अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी प्रतिभा नागलवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सध्या आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, डिझेल चोरी झाली आहे का याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही घटना प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, अशा पद्धतीने इंधनवाहिन्यांना धोका निर्माण झाल्यास मोठा अपघात घडू शकतो. या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group