शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे राज्यासह कांदा उत्पादन घेणाऱ्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्राने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय मध्यंतरी केंद्राने घेतला होता. मात्र, यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी या निर्णयाला मोठा विरोध देखील केला होता.
अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले गेले आहे. 1 एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. सोमवारी लासलगाव बाजारात आता कांद्याला काय बाजार भाव मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. देशात कांद्याला त्यामुळे निर्यात करता येत नसल्याने युरोप आणि इतर देशात पाकिस्तानच्या कांद्याला प्रचंड मागणी आली होती.